लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद

लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद

• अभियंता दिन, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम • एकाच दिवशी १०५ जणांनी केले रक्तदान

लातूर : अभियंता दिन आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने बांधकाम भवन येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. १०५ जणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता सर्वश्री देवेंद्र नीळकंठ, एम. एम. पाटील, गणेश क्षीरसागर, उप अभियंता संजय सावंत, वाहतूक पोलिस निरीक्षक गणेश कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अपघातामधील जखमी किंवा इतर अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. अशावेळी गरजूंना पुरेशा प्रमाणात रक्त उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करणे आवश्यक आहे. लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाने शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे आरोग्य विभागाला मदत होणार आहे. शासकीय रक्तपेढीमध्ये मुबलक प्रमाणात रक्त उपलब्ध होण्यासाठी असे उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे. तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी केले. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तकेंद्र विभागात रक्तदान करता येईल, असे त्यांनी सांगितले.
लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरासाठी जिल्ह्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, कंत्राटदार तसेच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या सहभागामुळे शासकीय रक्तपेढीमध्ये रक्तसंकलनाला हातभार लाभेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख म्हणाले. तसेच या शिबिराचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
तसेच इतक्या व्यापक स्वरूपातील शिबीर आयोजित केल्याबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांना सन्मानपत्र देण्यात आले. उपअभियंता संजय सावंत आणि राजेंद्र बिराजदार यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शाखा अभियंता भास्कर कांबळे यांनी केले. यावेळी लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *