औसा तालुक्यात प्रगत शिक्षण संस्थेचा ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत राबवलेला प्रकल्प दिशादर्शक

औसा तालुक्यात प्रगत शिक्षण संस्थेचा ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत राबवलेला प्रकल्प दिशादर्शक

औसा : लातूर जिल्हा हा प्रामुख्याने ‘लातूर पॅटर्न’साठी ओळखला जातो.प्रगत शिक्षण संस्था,फलटण, एच.टी पारेख फौंडेशन व पंचायत समिती औसा शिक्षण विभाग यांच्या संयुक्तपणे शैक्षणिक अखंडतेसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील पूल या प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या यादीमध्ये आकांशी तालुका म्हणून असणाऱ्या औसा तालुक्यात आम्ही काम करणार होतो.नवीन भागात काम करत असताना अनेक आव्हाने असतात.त्यात त्या भागातल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा लागतो.लातूर जिल्ह्याच्या सांख्यिकी माहितीसोबत सामाजिक, आर्थिक व राजकीय माहितीचा कच्चा धांडोळा घेऊन प्रत्यक्ष लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात काम सुरु झाले.फलटण तालुक्यात प्रगत शिक्षण संस्थेच्या विविध प्रकल्पावर जिल्हा परिषदेच्या शाळांसोबत काम करण्याचा माझा अनुभव होता.मागील पाच वर्षांच्या नर्चरिंग आर्ली लिटरसी इन् प्रायमरी स्कूल्स इन फलटण ब्लॉक या प्रकल्पावर केलेल्या कामाचा अनुभव गाठीशी होता. तालुका हा मागास तालुका म्हणून ओळखला जात असला तरी पुढे आम्ही जेव्हा इथल्या शिक्षकांसोबत, मुलांसोबत काम करायला सुरुवात केल्यानंतर हे लक्षात आलंय की,इथले शिक्षक अध्यापनाचे चांगले काम करत आहेत.काही शिक्षक नवीन अभ्यासक्रम,नवीन पुस्तके व अध्यापन तंत्रे आली तरी आपल्या पारंपारिक पद्धतीने अध्यापन करत होते. इथली मुलं ही चुणचुणीत होती.आम्ही घेतलेल्या अध्यापनातील घटकांना प्रतिसाद देणारी होती.राहून राहून हाच प्रश्न पडायचा की औसा हा आकांशी तालुका म्हणून का दाखवला गेला.याबद्दल काही जाणकार मुख्याध्यापकांशी बोलणे झाले.त्यांनी असं सांगितलं की अध्ययन निष्पत्तीमध्ये मुद्दामहून आमचे काही शिक्षक कमी प्रगती दाखवतात.उगाच प्रसिध्दी नको किंवा इतर कामाचा जादाचा भार नको.आपली मुलं आणि आपण या भूमिकेतूनच आमचे शिक्षक कायम नवनवीन प्रयोग करत असतात आणि प्रसिद्धीपासून कायमच लांब असतात.आणि त्यांचे म्हणणे मलाही खरे वाटले.
मराठवाड्यातील विशेषतः लातूर औसा या भागातील संशोधने आणि काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.त्यातून अशी माहिती समोर आली की,या भागात दर्जेदार शिक्षणाचा अभाव, साक्षरते दर कमी आणि उच्च शिक्षणासाठी मर्यादित संधी या सर्व महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना इथल्या विद्यार्थ्यांना करावा लागतो.इथल्या प्राथमिक समस्यांपैकी एक समस्या म्हणजे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा इथे आभाव असल्याचे चित्र दिसून येत होते, विशेषतः ग्रामीण भागात हे प्रकर्षाने जाणवत होते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याच्या संधींची उपलब्ध कमी असल्याने त्यांना चांगल्या शैक्षणिक संधींच्या शोधात इतर जिल्ह्यात स्थलांतरित होण्यास भाग पडत होते.याव्यतिरिक्त मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि मर्यादित संसाधने यांच्याशी संघर्ष करावा लागतो.अपंग विद्यार्थ्यांसाठी तर आव्हाने अधिकच होती. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, मराठवाड्यातील अपंग व्यक्तींना शिक्षण घेताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता,ज्यात प्रवेशाचा अभाव, अपुऱ्या सुविधा आणि कौशल्य विकासासाठी मर्यादित संधी यांचा समावेश होतो.या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, शैक्षणिक पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण आणि संसाधनांमध्ये वाढीव गुंतवणूकीची आवश्यकता आहे. शिवाय, अपंग विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशकता आणि सुलभतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम सुरु व्हायला हवेत.एकंदरीत सर्वच विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी समान संधी मिळतील याचा विचार होणे गरजेचे असून त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे.या असा वातावरणात सन २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात आम्ही लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात दाखल झालो. जिल्हा परिषद शाळांच्या सोबतचा अनुभव इथे काम करताना आमच्या गाठीशी होता.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मोठ्या स्तरावरील शैक्षणिक प्रकल्प राबवताना भावनिक पातळीपेक्षा व्यवस्थेच्या मार्गाने जाऊन संबंध ठेवले पाहिजेत.तर आणि तरच त्याचा फायदा प्रकल्प राबवताना होतो.प्रशासकीय सहसंबंध हा भाग कायम माझा जमेची बाजू राहिली असल्याने ती जबाबदारी मी समर्थपणे पेलली आहे.प्रगत शिक्षण संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोठ्या प्रकल्पामध्ये मी कायम प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांशी सलोखा, मैत्री आणि शासकीय यंत्रणेला बाधा न पोहचवता काम केले आहे.त्याचा नेहमीच फायदा होत आला आहे.लातूर मध्ये काम करत असताना केंद्रसरकारच्या निपुण भारत अंतर्गत लातूर व सातारा या जिल्ह्यात काम करण्यासंबंधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,मुंबई यांचे पत्र मिळण्यापूर्वीच लातूर जिल्ह्यात काम सुरु झाले होते.यासाठी परवानगी पत्र मिळणे आवश्यक असल्याने मी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिनव गोयल, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.फुलारी यांना पत्र देऊन मान्यता मागितली.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिनव गोयल शिक्षणातील दर्दी असल्याने त्याच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणावर विशेष भर होता.त्यांना प्रकल्प कालावधीत ते बदलून जाईपर्यंत ज्या ज्या वेळी भेटलो त्यांनी कायम प्रकल्पावर विश्वास दाखवला.त्यांनी कायम पाठींबा दिला.ज्या ज्या वेळी भेटायला जायचो त्या त्या वेळी भेटीसाठी वेळ दिला.त्यांनी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणासाठी वापरली जाणारी संदर्भ साधने मागून घेतली. त्यांनी लातूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळात Building as Learning Aid(BALA) ‘बाला’ नावाचा प्रकल्प ही सुरु केला होता.तरीही शैक्षणिक अखंडतेसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील पूल या प्रकल्पांतर्गत औसा तालुक्यातील शाळांसोबत निपुण भारत अंतर्गत सुरु असणाऱ्या आमच्या प्रकल्पास पाठींबा दर्शविला मदत केली. जागतिक स्तरावर कोरोनासारख्या महामारीने जनजीवन विस्कळीत झालेले असताना अगदी सुरवातीला सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत फक्त १ महिना शालेय कामकाजाचा झाले. पण काम सुरु राहावे असे आम्हाला कायम वाटत होते.५ प्रकल्प सहाय्यक व १ प्रकल्प अधिकारी एवढा स्टाफ नुसता बसून काय करणार? कारण शाळा उघडू नये,विद्यार्थी गोळा करू नये असे स्पष्ट आदेश होते.म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिनव गोयल यांची भेट घेतली.त्यांना सांगितले की मुलांच्या सुरक्षेची काळजी घेऊन आम्ही गावच्या त्या त्या भागात मुलांचे अध्यापन त्यात भाषिक व गणितीय क्रिया घेण्यास तयार आहोत पण केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक शाळा उघडून द्यायला तयार नाहीत.यावर मार्ग काढण्यासाठी श्री.अभिनव गोयल यांनी आम्हाला ‘शिक्षक मित्र’ म्हणून सुरक्षेची काळजी घेऊन काम करण्याची परवानगी दिली.
औसा तालुक्यात काम करताना जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीम.भागीरथी गिरी,सतीश भापकर सर, पंचायत समिती औसा च्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.अनुपमा भंडारी, विस्तार अधिकारी कापसेसर, उमाकांत जाधव सर, सर्व केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती किशोर सोनवणे, विजय राठोड व अनिरुध्द वाघमारे सर यांनी ही मोलाचे योगदान व सहकार्य केले.त्यांनी प्रकल्पातील शाळांच्या इयत्ता १ ली व इयत्ता २ रीच्या शिक्षकांना प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यास सांगितले व प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.त्यामुळेच प्रकल्प यशस्वी झाला.प्रकल्पांतर्गत प्रकल्प अधिकारी सोमीनाथ घोरपडे यांनी औसा प्रकल्प यशस्वीपणे राबवला.सोबत प्रमोद राजगुरू, पांडुरंग धाईंजे, जयश्री कदम, गणेश पांचाळ, शुभांगी चिकराळे, मुक्ता बनसोडे, साक्षी जोशी, राजश्री कांबळे व प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले यांनी प्रकल्प पुढे घेऊन जाण्याचे काम केले.त्यामुळेच २५ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बदल दिसून आले.
इथल्या प्रत्येक शाळांमध्ये ग्रंथालये आहेत.परंतु त्याचा वापर होताना मला दिसून आला नाही.ग्रंथालयातील पुस्तके मात्र आपल्या ग्रंथालयांपेक्षा वेगळी होती.बहुतांश पुस्तके ही मोठ्यांसाठी किंवा वरच्या वर्गातल्या मुलांसाठी असणारीच होती.त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्राथमिक स्तर विचारात घेऊन आकर्षक व मोठी चित्र व मजकूर कमी अशी असणारी पुस्तकं नसल्यासारखीच होती.त्यामुळे या पुस्तकाकडे मुलांचे किंबहुना शिक्षकांचेही दुर्लक्ष होते.ग्रंथालये ही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी म्हणजेच भाषिक विकासासाठी उपयुक्त असतात.ग्रंथालयातील पुस्तकांची मुलांच्या भाषाविकासासाठी जोड देता येते.हे अजून इथे रुजलेले दिसले नाही.त्यामुळे या प्रकल्पांतर्गत घेऊन गेलेली पुस्तके मुलं आधाशासारखी वाचत होती. त्यातील चित्र पाहत ती मुले एकमेकांशी चर्चा करत होती.शिक्षक व मुख्याध्यापकांना ही आमची पुस्तकं खूप आवडली होती.या पुस्तकाची वैशिष्टे त्यांना न सांगताच समजली होती.त्यामुळे इथल्या कित्येक मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी ही पुस्तके कुठे मिळतात अशी आमच्याकडे विचारणा केली होती.ग्रंथालयातील पुस्तकांची मुलांच्या भाषिक विकासाला जोड देता येते हे अजून इथे खोलवर रुजवण्याची गरज होती.मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत प्रयत्न केले.कोरोना काळात टाळेबंदीमुळे अनेक निर्बंध लादण्यात आले.अशा परिस्थितीमध्ये शाळा बंद झाल्या आणि मुले शाळेत येणे थांबले.त्यामुळे आम्ही ही पुस्तके मुलांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवू लागलो. वानवडा शाळेत माझे सहकारी राजगुरू सर यांनी ‘सुशीलाच्या रांगोळ्या’ या पुस्तकाचे प्रकट वाचन केले तेव्हा प्रकट वाचन करताना चित्र निरीक्षण करताना मुलांचा प्रतिसाद चांगला होता. मुलांना पुस्तक खूप आवडले. त्यानंतर त्यांना पुस्तकातील कोणते चित्र आवडते?असा प्रश्न विचारला असता मुलांनी रेल्वेचे चित्र, पतंगावर काढलेली रांगोळी, चांदण्यांचे चित्र अशी उत्तरे दिली. शाळेत चित्ररूप गोष्टींची पुस्तके नाहीत.त्यामुळे मुलांना ही पुस्तके खूप आवडली.
असं म्हणतात दर दहा कोसांवर भाषा बदलते.ते खरं आहे नुसती भाषाच बदलत नाही तर त्या भाषेतील शब्द हे सुद्धा नवीन आपल्याला पाहायला ऐकायल मिळतात.भाषा हा त्या-त्या संस्कृतीचा व मानवी जडणघडण व सहजीवनाचा अनमोल ठेवा आहे.त्यामुळे नुसती भाषा बदलत नसून भाषेबरोबर माणसाचे राहणीमान,त्यांची संस्कृती,त्यांचा विचार, जगण्याची पद्धती ती ही बदलत असते.साताऱ्यातील माण फलटणसारख्या पूर्वीच्या दुष्काळी व आत्ताच्या बागायती भागात बोलल्या जाणार्याज भाषेपेक्षा इथली भाषा व या भाषेतील शब्द आम्हाला नव्याने शिकायला मिळाले.प्रगत शिक्षण संस्था फलटण व पंचायत समिती औसा शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणार्याा प्रकल्पाअंतर्गत काम करताना औसामध्ये आपल्याला नवनवीन शब्द ऐकायला मिळले.त्यावरून मराठी भाषा किती समृद्ध आहे हे आम्हाला कळाले.आमच्या मार्गदर्शिका डॉ.मंजिरी निंबकर नेहमी सांगतात की,भाषेमधील शब्दांशी गंमत करता आली पाहिजे, खेळता आले पाहिजे.औसा तालुक्यातील शाळांमध्ये शाळा भेटीदरम्यान मुलांकडून नवनवीन शब्द शिकायला मिळाले जसे तोर – मोहोर, काडकुळया – काटक्या, मिरची – मिरजू, टोपी घालणे – टोपी लेवली, गुंडगी – बिडगी, व्याली – हळजली, बीळ – वेज, नुसा – मसकिडे, चित्री केळी – चिटची केळी अशा अनेक शब्द आम्हाला नव्याने शिकायला मिळाले.शब्द ऐकताना थोडी गंमत वाटत होती परंतु हा तर मराठी भाषेतला गोडवा आहे हे आम्हाला यावरून समजत होते.
मुलांना परिसर भेट ही समृद्ध अनुभव देणारी महत्त्वाची गोष्ट आहे.याला पुस्तकी भाषेत क्षेत्र भेट ही म्हटले जाते. प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या मुलांना आवर्जून चार भिंतीच्या बाहेर परिसरातील गोष्टी दाखवण्यासाठी शिक्षक घेऊन जातात.परिसर भेटीला जाण्यापूर्वी एक नियोजन केलेले असते.जसे की परिसर भेटीला कुठे जायचे?कधी जायचे?कसे जायचे?किती वेळ जायचे?क्षेत्रभेटीसाठी निवडलेले ठिकाण जिल्हा परिषद शाळांमधील मुलांसाठी सुरक्षित आहे का?तिथे मुलांना काय माहिती द्यायची?कोण कोणत्या गोष्टी पहायच्या?कोणाशी संपर्क किंवा संवाद साधायचा? या सर्व गोष्टींचे एक नियोजन करून मग मुलांना क्षेत्र भेट किंवा परिसर भेटीला नेले जाते. परिसर भेटीमध्ये मुलांना शेती दाखवण्यासाठी नेले असता या भेटीच्या दरम्यान रस्त्यात आढळणारे पाळीव प्राणी, वेगवेगळ्या बांधणीची घरे,पडझड झालेले जुने वाडे,याबरोबरच रस्त्यात उभी असणारी आणि ग्रामीण भागात हमखास आढळणारी बैलगाडी, दुचाकी, चारचाकी वाहने, शेतकऱ्यांची मशागतीची अवजारे ही मुलांना दाखवली जातात.सोबत रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, वेली, फळ झाडे व फुल झाडे याची ही माहिती देत परिसर भेट नियोजित ठिकाणी पोहचते.नियोजित ठिकाणी पोहचल्यावर शेतकरी दादांशी संवाद साधत पिकांची माहिती घेतात.जर शेतात खाण्यासारख्या गोष्टी जसे की, फळे, कडधान्ये, भुईमुगाच्या शेंगा, ऊस या गोष्टी मुलांना खाण्यासाठी देतात.या परिसर भेटीत आवर्जून एकाद दुसरा पालक त्यातल्या त्यात माता पालक आवर्जून उपस्थित असतात.अशी शेतातील परिसर भेट संपन्न होते.
परिसर भेटीवरून शाळेत परत आल्यानंतर आपण आज काय काय पाहिलं? तुम्ही काय काय निरीक्षणे केली,कोणत्या कोणत्या पक्षांचे आवाज ऐकले.यावर शिक्षक विस्तृत चर्चा करतात. मुलांनी ही परिसर भेटीदरम्यान केलेली निरीक्षण,त्यांचे अनुभव शाळेत सांगण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते.विद्यार्थी पाहिलेल्या,निरीक्षण केलेल्या गोष्टी सांगतात.त्यानंतर विद्यार्थ्यांना पाहिलेल्या गोष्टींचे चित्र काढण्यासाठी कागद देऊन त्यावरती चित्र व त्याची स्वलिपीत गोष्ट लिहिण्यासाठी दिली जाते.विद्यार्थी पाहिलेल्या सर्व गोष्टींचे चित्र काढून निरीक्षणे स्वलिपीत लिहितात.चित्र काढून झाल्यावर चित्र तेलखडू घेऊन आवडीच्या रंगाने रंगवतात.शिक्षक या दरम्यान मुलांना प्रोत्साहन देतात.मुलांनी काढलेली चित्र शाळेच्या वर्गभिंतीवर डिस्प्ले बोर्डवर डिस्प्ले केली जातात.यातून विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळतो.विद्यार्थी आपले आई –वडील शाळेत आल्यावर स्वतःचे चित्र आग्रहाने दाखवतात.एवढेच नाही तर त्याची गोष्ट ही सांगतात.
औसा तालुक्यातील शिक्षकांची प्रशासकीय प्रशिक्षणे ही कायम होत होती पण प्रकल्पांतर्गत होणारी प्रशिक्षणे यामध्ये सर्वात महत्वाचा फरक म्हणजे शिक्षकांचा कृतियुक्त सहभाग, घटकनिहाय मार्गदर्शन, दृकश्राव्य माध्यमांचा वापर, कृतियुक्त अभिनय गीते,भाषिक खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण, नाट्यीकरण हे होते.सर्व भाषा प्रशिक्षणे ही प्रगत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष तथा विश्वस्त भाषातज्ञ डॉ.मंजिरी निंबकर त्यांनी अतिशय ओघवत्या व माहितीपूर्ण आणि भाषाशास्त्रावर आधारित प्रशिक्षणे घेतली. भाषा म्हणजे काय?लिपी परिचय, वर्णमाला, कार्यात्मक व्याकरण, जोडाक्षरे, मुलांचे अंकुरती साक्षरता ते स्वतंत्र लेखन हा प्रवास ते प्रत्यक्ष अध्यापन यावर विस्तृत मार्गदर्शन केले.त्यांच्या सोबत मानसी महाजन,कमला निंबकर बालभवनच्या मुख्याध्यापिका श्रीम.प्रियदर्शनी सावंत यांनीही प्रशिक्षणे घेतली. याचा शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीवर चांगला प्रभाव पडला.शिक्षकांनी अध्यापन पद्धती बदलली. शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर व गट पद्धतीने अध्यापन,वर्ग भिंतीवरील मांडणी यात बदल झाला.बडबड गीतांची १० पोस्टर,आपण वाचू या पुस्तिका इयत्ता १ लीच्या सर्व मुलांना देण्यात आली, शिक्षकांसाठी मुले शिकती करताना ही पुस्तिका देण्यात आली.
गणितांच्या प्रशिक्षणासाठी मात्र गणितात काम करणाऱ्या नवनिर्मिती लर्निंग फौंडेशन या संस्थेच्या गीता महाशब्दे, प्रियवंदा बारभाई, स्वाती मोरे आणि खानविलकर यांनी अतिशय उत्कृष्ट प्रशिक्षण दिले.त्यांच्याकडून विकसित केलेले बरेच साहित्य हे शाळांना देण्यात आले होते.त्यात गणित तालीम भाग १ व गणित तालीम भाग २ या पुस्तिका अनुक्रमे इयत्ता १ ली व इयत्ता २ रीच्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.सोबत काही गणितीय साहित्य देण्यात आले होते.त्यामुळे मुलांच्या गणितीय क्षमता व संकल्पना स्पष्ट झाल्या.अंकांची ओळख,दशक संकल्पना,एक अंकी व दोन अंकी संख्येची बेरीज वजबाकी विद्यार्थी करू लागले.
या प्रकल्पातील ९ शिक्षक व लातूर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील प्रत्येकी १ आहे १६ शिक्षक,१ विस्तार अधिकारी व एक केंद्रप्रमुख यांचा अभ्यास दौरा वर्धा येथील नई तालीम समिती मार्फत चालवल्या जाणाऱ्या आनंदनिकेतन ही शाळा पाहण्यासाठी आयोजित करण्यात आला.यात पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील काम,वर्ग अध्यापन, शैक्षणिक साहित्य, कला, क्रीडा, चर्चा सत्र या सर्व गोष्टी करण्यात आल्या.त्यासोबत सेवाग्राम आश्रम, पवनार येथील विनोबा समाधी, गीताई मंदिर, विश्वशांती स्तूप, मगन संग्रहालय,कापूस ते कापड हा प्रवास पाहण्याची संधी शिक्षकांना देण्यात आली.
प्रगत शिक्षण संस्था ही गेली ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षण क्षेत्रात काम करणारी अग्रणी संस्था असून या संस्थेची स्थापन भाषातज्ञ डॉ.मॅक्सीन बर्नसन यांनी केली असून त्यांनी विकसित केलेल्या प्रगत वाचन पद्धतीच्या आधारे भाषा शिक्षण पुढे घेऊन जाण्याचे काम संस्थेच्या विश्वस्त तथा उपाध्यक्ष भाषातज्ञ डॉ,मंजिरी निंबकर या करत आहेत.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यात हा प्रकल्प राबवण्यात आला.भाषेच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळत इथल्या शाळांच्या व शिक्षकांच्या क्षमतावृद्धी साठी निपुण भारत अंतर्गत चांगले काम सुरु केले.त्यांच्या या कामामुळेच औसा तालुक्यात प्रगत शिक्षण संस्थेचा ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत राबवलेला प्रकल्प दिशादर्शक ठरला आहे.

श्री.सोमीनाथ पोपट घोरपडे
प्रकल्प अधिकारी,प्रगत शिक्षण संस्था,फलटण
उपकेंद्र – औसा,लातूर
मो.नं.७३८७१४५४०७

editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *