लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दोन दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवाचे शाहू महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे होते. तसेच उपप्राचार्य सदाशिव शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैय्या, परीक्षक प्राचार्य डॉ. राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते.
लातूर हे ज्ञानरुपी रत्नांची खाण असून जिल्हास्तरीय युवक महोत्सवाच्या माध्यमातून युवकांतील विविध कलागुणांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून मिळालेल्या संधीतून जिल्ह्यातील युवकांनी आपल्या जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती आयरे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी युवकांतील कलागुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक युवकांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी नियमीत अभ्यासासोबतच दररोज कला व क्रीडा कौशल्याचा सराव करून आपली कौशल्य विकसित केली पाहिजेत, असे प्राचार्य श्री. गव्हाणे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात कविता लेखन, कथा लेखन, मोबाईल फोटोग्राफी, चित्रकला स्पर्धा, सामूहिक लोकगीत स्पर्धा, सामूहिक लोकनृत्य स्पर्धा, विज्ञान मेळावा आदीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील विजेत्यांना विभागस्तरीय स्पर्धेत, तसेच विभागस्तरावरील विजेत्यांना राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच राज्यस्तरावरील विजेत्यांना दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होता येईल.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जिल्ह्यातील जवळपास २०० युवक-युवतींनी सहभाग घेतला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधीकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, बाबासाहेब इंगोले, धिरज बावणे, चंद्रकांत लोदगेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रसाद वैद्य, तसेच नेहरू युवा केंद्राचे संजय ममदापुरे, शुभम पाटील, प्रशात सांबने यांनी विशेष परीश्रम घेतले.