जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्या हस्ते विभागीय युवा महोत्सवाचे उत्साहात उद्धाटन

जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्या हस्ते विभागीय युवा महोत्सवाचे उत्साहात उद्धाटन

लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयअंतर्गत लातूर विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय युवा महोत्सव सन 2024-2025 चे आयोजन 8 ते 9 डिसेंबर 2024 या कालावधीत राजर्षी शाहू महाविद्यालय येथे करण्यात आले होते. 8 डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे, प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय उपसंचालक युवराज नाईक, उपप्राचार्य सदाशिव शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, परीक्षक प्राचार्य डॉ. राम बोरगावकर, लेखक विवेक सौताडेकर, संभाजीराव नवघरे, प्रा.अनिरुद्ध बिराजदार हे उपस्थीत होते.
युवकांनी विभागीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध संधीचा उपयोग करून भविष्यात सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करावी. तसेच युवा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांनी राज्यस्तर तसेच राष्ट्रीय स्तरावर लातूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी केले.
प्रास्ताविक विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले. स्पर्धेत विजयी होण्यापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे हे महत्वाचे आहे. सर्व कलाकारांनी या विभागीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होऊन त्यांच्या कलेचे उत्तम सादरीकरण करावे असे श्री नाईक म्हणाले. तसेच सर्व कलाकार स्पर्धकांना विभागीय युवा महोत्सव स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.
युवकांमधील कलागुणांना उत्तम व्यासपीठ निर्माण करुन देण्याचे कार्य युवा महोत्सवाच्या माध्यमातून होत असून प्रत्येक युवकांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबतच दररोज कला व क्रीडाचा सराव करावा, असे आवाहन प्राचार्य महादेव गव्हाणे यांनी केले.विभागीय युवा महोत्सवात कविता लेखन, कथा लेखन, मोबाईल फोटोग्राफी, चित्रकला स्पर्धा, सामूहीक लोकगीत स्पर्धा, सामूहीक लोकनृत्य स्पर्धा, विज्ञान मेळावा आदीचे आयोजन करण्यात आले. लातूर विभागातील लातूर, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यातून जिल्हास्तरावरील विजेते कलाकार विभागीय महोत्सवात सहभागी झालेले होते. विभागीय युवा महोत्सवातील विजेते राज्यस्तरावरील महोत्सवात भाग घेतील, तसेच राज्यस्तरावरील विजेते दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात भाग घेतील.
विभागीय युवा महोत्सवात विभागातील एकूण 90 युवकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसंचालक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दत्ता गडपल्लेवार, कृष्णा केंद्रे, बाबासाहेब इंगोले, धिरज बावणे, राजेंद्र जाधव, स्वप्नील मुळे, प्रसाद वैद्य, सागर पोतदार, बालाजी तेलंगे, गणेश वंगवाड यांनी विशेष परीश्रम घेतले.

editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *