लातूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या असंविधानिक वक्तव्याचा निषेध शिवसेनेने गुरुवारी नोंदविला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच केलेल्या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अमित शहा यांनी जे वक्तव्य केले ते आपल्या लोकशाही देशासाठी मोठ्या प्रमाणावर घातक आहे. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केले आहे यावरुन असे लक्षात येते की देश हा हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे त्यामुळे देशातील तमाम लोकशाहीला मानणाऱ्या व लोकशाहीचे संवर्धन करणाऱ्या नागरिकांमध्ये तणाव व अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच अशी वक्तव्य देशात होत राहीली तर देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही व देशामध्ये अशांतता निर्माण होईल,असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या संविधानाला माननाऱ्या सर्व देशातील नागरिकांवर अन्याय केल्यासारखे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी उद्गार काढले आहेत. त्यामुळे त्यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा कसलाही नैतिक अधिकार राहत नाही. त्यामुळे अमित शहा यांनी त्वरीत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व देशाची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा संघटक जयश्री उटगे, सौ. सुनीता चाळक, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, युवती प्रमुख ॲड. श्रध्दा जवळगेकर, युवा सेना प्रमुख दिनेश जावळे, निलंगा तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, संतोष सुर्यवंशी, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, देवणी तालुका प्रमुख मुकेश सुडे, शिवाजी चव्हाण, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे ॲड. रवी पिचारे, संजय उजळंबे, रेखा पुजारी, दैवशाला सगर, सुनीता भोसले, सतीश शिवणे, सुनील नाईकवाडे यांच्या सह शिवसैनिकाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.