सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी जोरात चालू आहे,अपेक्षेप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष कामालाही लागले आहेत. मोठमोठ्या सभा भरवल्या जात आहेत, सभेसाठी भाडोत्री वाहने, माणसं आणून मोठ्या प्रमाणात माॅब दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक पक्ष व अपक्ष आयोजित केलेल्या सभेतून एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करतो आहे,आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी कोणी काय केले याचा हिशोब मांडला जात आहे.मतदार बंधू-भगिनींना आम्ही निवडूण आल्यावर अमूक- तमूक करू अशा प्रकारचे अनेक आश्वासने दिली जात आहेत. सध्या या एकूणच निवडणूकीच्या रणधुमाळीत जनतेला बिनपैशाचा तमाशा पाहावयास मिळून घटकाभर त्यांची करमणूक होऊन जनता काही काळ सुखावते आहे, प्रत्यक्षात कोणी काय केले याचा हिशोब सत्ताधारी- विरोधकांनी जनतेसमोर ठेवण्यापेक्षा हा सर्व हिशोब जनतेकडे आहे आणि त्याची गोळाबेरीज या निवडणूकीत होईल.निवडणूकीच्या पटलावर हा हिशोब मांडताना मतदान बंधू- भगिनींनी याचे भान ठेवले पाहिजे की आतापर्यंत सर्वच हिशोब चुकले असतील- नसतील पण आता मात्र अचूक हिशोब करण्याची, निर्णय घेण्याची वेळ,जबाबदारी मतदार बंधू- भगिनीवर येऊन ठेपली आहे; त्यामुळे विकासगंगा आपापल्या वार्डात,प्रभागात, मतदारसंघात आणून कामे झाली असे त्या त्या भागातील आमदारांचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे येईल, आम्हीच कसे विकासकामे करतो हे वेगवेगळ्या उदाहरणांनी दाखवून देतील, सत्ताधारी व विरोधी पार्टीचे सेल( ओबिसी, अल्पसंख्यांक,अनुसूचीत जाती) बहुजनांच्या मतांची खरेदी करण्यासाठी धडपडतील, तेव्हा मतदार बंधू- भगिनींनो सु- जाणते व्हा!
ऐन निवडणुकीच्या काळात पुढारी स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी विचारधारेशी एकनिष्ठ न राहता पक्ष बदलतात, मात्तबर राजकारणी मंडळी मताची हेराफेरी करण्यास, हवा फिरवण्यास माहीर, तरबेज असतात. मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दिली जातात, वेळप्रसंगी अर्थपुरवठा किंवा भेटवस्तू विविध सेल च्या माध्यमातून थेट मतदार बंधू- भगिनीपर्यंत पोहचवल्या जातात; पण मतदार बंधू- भगिनींनी या प्रलोभनाला,अर्थपुरवठा किंवा भेटवस्तूला बळी न पडता जागरूक होऊन मतदान करण्याची खरी गरज आहे.मतदारांनी जागरूक होऊन मतदान केल्यास आपल्या विधानसभा मतदार संघाचे चित्र वेगळेच असेल. आपल्या विधानसभा मतदार संघाचा चांगल्या प्रकारे विकास घडवून आणावयाचा असेल तर प्रत्येक मतदार बंधू- भगिनींनी चांगले लोकप्रतिनिधी सत्तेत आणण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.सत्ताधारी व विरोधी पक्षाला न घाबरता, त्यांच्या आश्वासनाला, प्रलोभनाला, अर्थपुरवठा व भेटवस्तूला बळी न पडता,जाती-पाती ला थारा न देता चांगले कार्य करणाऱ्याला आपले अमूल्य- बहुमूल्य मत द्यावे, मतदान करावे. सत्तांध ,मदमस्त,भांडवलदार यांना बाजूला सारून प्रमाणिकपणे चांगले कार्य करणाऱ्या चारित्र्यसंपन्न व्यक्तीला आपले बहुमूल्य मत द्यावे.
आपल्या मताचा,विचाराचा पुढारी निवडूण दिला तर आपल्या प्रगतीच्या कार्याला गती मिळेल,यश येईल.निवडणूका म्हटले की मतदार बंधू-भगिनींना महत्व प्राप्त होते याचा संपुर्ण विचार करून मतदारांनी आपल्या मतदार संघाच्या, तालूक्याच्या विकासासाठी, स्वत:च्या व आपल्या मुलां- बाळांच्मा,भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी विचारपुर्वक मतदान केलेच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार चांगल्या व्यक्तीसाठी, चांगल्या कामासाठी,यशस्वी तालूका जिल्हा,राज्य, देश निर्मीतीसाठी वापरला पाहिजे.नागरिकांना पक्षीय राजकारणापेक्षा नागरी सोयीसुविधा मिळणे फार गरजेचे आहे, त्या योग्य पद्धतीने मिळवून देणाऱ्याला भरभरून मते मिळायलाच हवीय. तरच सत्तांध,मदमस्त,गुंड,भांडवलदारांची मस्ती जिरेल व सामान्य माणसाच्या विकासाला पोषक वातावरण तयार करणाऱ्या सच्चा लोकप्रतिनिधींना वाव मिळेल.
अर्जुन कांबळे, माटेफळकर
मो.नं.9922111746