निवडणूक घोषणा ते निकाल जाहीर करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे सूक्ष्म नियोजन करावे- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

निवडणूक घोषणा ते निकाल जाहीर करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे सूक्ष्म नियोजन करावे- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लातूर : आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांनी निवडणुकीच्या घोषणेपासून ते मतदानाचा निकाल जाहीर करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीचे सूक्ष्म नियोजन करावे. निवडणूक कामाला प्राधान्य देऊन यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात व्यापक मतदार जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे. विशेषतः गत लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या गावात, मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. याबाबतचा कृती आराखडा तयार करून जिल्हास्तरीय स्वीप कक्षाला सादर करावा. नवीन मतदान केंद्रांची निर्मितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे मतदान केंद्रामध्ये बदल झाला असल्यास त्या मतदान केंद्रावरील मतदारांना याबाबत माहिती द्यावी. यासाठी ग्रामसेवक, तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी द्यावी. मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधांची उपलब्धता करून देण्याबाबत आतापासूनच पूर्वतयारी करून ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येकाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. निवडणूक कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्ह्यातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपल्या मतदारसंघातील पूर्वतयारीबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले. तसेच उपजिल्हा निवडणूक निणर्य अधिकारी डॉ. कदम यांनी जिल्हास्तरावरून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली व मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *